Thursday, 29 September 2016

येणे वरे ज्ञानदेवो सुखीया जाहला........
     कुरुक्षेत्राच्या युद्ध भूमीवर भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला जीवनाचे उद्धार करणारी राजविद्या राजगुह्ययोग अशी भगवतगीता सांगितली.

     भगवतगीतेचं व्यासपीठाबाबत मला फार कौतुक वाटते. जेथे आता महाभयानक घनघोर युद्ध होणार आहे. अशा ठिकाणी भगवतगीता सांगितली गेलीय ज्याने सांगितली तो कदाचित सांगण्याच्या तयारीने आलाही असेल परंतू अर्जुन मात्र युद्धच करायला आला होता. आणी तशाही परिस्थितीत त्याने ती ऐकली आणी त्याचा ऊद्धार झाला. व्यासांनी हा उपदेश भगवतगीतेच्या रुपात संस्कृत भाषेत 700 श्लोकात लिहून काढला. आणी येथेच तुमच्या आमच्या जीवनात अंधकार दाटला. आम्ही त्या दिव्य ज्ञानापासून दुरावलो. कारण ते ज्ञान आम्हाला अवगत नव्हते. नव्हे नव्हे ते प्राप्त करण्याचा अधिकार आम्हाला नव्हता. म्हणून आम्हाला ते भगवंताचं एवढे श्रेष्ठ अमृतमय ज्ञान त्या अंधकारात लोपल्या गेलं.आणी मग माझे ज्ञानोबाराय अवताराला आले .
ब्रम्हमुर्ती संत जगी अवतरले |
ऊद्धारया आले दीन जना ||      
   माऊली ज्ञानोबारायांनी पाहिलं . सगळीकडे अज्ञानाचा अंधकार आहे. सामान्य जीवाला ईच्छा असूनही ,पक्वानांनी भरलेले ताट समोर वाढून ठेवलय परंतू ते खाण्याचा अधिकार त्यांना नव्हता माऊली ज्ञानोबाराय म्हणतात,

सहजें ब्रह्मरसाचें पारणें |
केलें अर्जुनालागीं नारायणें |
की तेचि अवसरी पाहुणे |
पातलों आम्ही ||
कैसी दैवाची थोरी नेणिजे |
जैसें तान्हेलिया तोय सेविजे |
कीं तेंचि चवी करुनि पाहिजे |
तंव अमृत आहे ||    
  असे हे ब्रम्हरसाचे ताट आमचं भाग्य थोर, अर्जुनाचे पांती बसून आम्हाला त्याचा आस्वाद घेता येईल. आणी माऊलीनी त्या ७०० श्लोकाचं ९०३० ओव्यात सुंदर सोप्या मराठीत रुपांतर केले
सुंदर अशी ज्ञानेश्वरी लिहली. ती घेऊन आपल्या सदगुरुसमोर उभे राहिले. आणी विनंती केली की हे ज्ञान या जगाला वाटण्याची परवानगी मागितली. निवृत्ती दादा नाथ संप्रदायाचे असल्याने एक गुरू एक शिष्य परंपरेतील होते. त्यांना हे मान्यच नव्हते,
माऊलींनी दादांना हात पसरले . कळकळून विनंती केली. पाय धरले. डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. पसायदान मागितलं
आणी निवृत्ती दादांच्या मुखातून आशिर्वाद बाहेर पडला.
येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ |
हा होईल दान पसावो |
येणे वरे ज्ञानदेवो |
सुखीया जाहला ||    
   मागे पुढे दाटलेला ज्ञानाचा उजेड आणला. आणि कैवल्यपदाचा मार्ग आमच्या अंगणा पर्यंत आणला.
आणी तो उजेड म्हणजेच माझे ज्ञानोबाराय. तेच कैवल्य पदाला प्राप्त झाले. आणी तो उजेड निरंतर उजेड राहिला.
आमच्या आयुष्यातील अंधकार अस्तास गेला. अंधारातून उजेडाकडे, मृत्यू कडून अमरत्वाकडे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे आमची वाटचाल चालू झाली.
जय जय मुक्ताई